'पावनखिंड' चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली घोषणा

By  
on  

पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्य अध्याय आहे. पावनखिंडीची हीच शौर्यगाधा 'पावनखिंड' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव जंगजौहर असं ठेवण्यात आलं होतं. मात्र ते बदलून हा चित्रपट पावनखिंड या नावाने प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झाला. हा चित्रपट याचवर्षी 10 जूनला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सध्याची कोरोना काळातली परिस्थिती पाहता या चित्रपटाचं प्रदर्शित आता लांबणीवर गेलं आहे.

'पावनखिंड' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नुकतीच याविषयी घोषणा केली आहे. थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचं ते सांगतायत. दिग्पाल यांनी नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेल्याचं त्यांनी घोषीत केलय.

या पोस्टमध्ये लिहीलय की, "मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित आणि थरारक अध्याय. अजोड पराक्रम आणि बलिदानाची ही यशोगाथा कायमच आपल्याला प्रेरणा देत आली आहे. बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा अतुलनीय पराक्रम आलमंड्स क्रिएशन्सच्या पावनखिंड या कलाकृतीद्वारे मराठी पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. येत्या 10 जूनला या अविस्मरणीय कालखंडाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणारच होती की, त्याआधीच करोना संकटाचे वादळ घोंगावू लागलं. अवघ्या मानवजातीला हादरवून सोडणारं हे वादळ आता काहीसं शमलं असलं तरी, त्याचं पूर्ण निवारण झालं नाही. या अटीतटीच्या क्षणी ज्या धीरोदत्तपणे आपण सर्वजण या संकटाला सामोरे गेलो ते खरंच कौतुकास्पद आहे. लढाई अजूनही संपलेली नाहीये. ही लढाई आपल्याला यशस्वी करून दाखवायची असेल तर त्यासाठी अजून काही काळ निर्बंध पाळत आपल्याला सुद्धा ही खिंड संयमाने लढवायची आहे. म्हणूनच थोड्याश्या विरामानंतर त्याच जोमाने आणि जोशाने आम्ही लवकरच येणार आहोत याची ग्वाही आपणास देतो. भेटू चित्रपटगृहातच."

 

दिग्पाल लांजेकर यांनी मराठीत विविध ऐतिहासिक चित्रपट बनवले आहेत. इतिहासावरील त्याचंं प्रेम आणि सखोल अभ्यास यासाठी ते प्रसिद्ध आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त या चित्रपटांनंतर ते लवकरच पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता लांबणीवर गेली असली तरी लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात घेऊन येणार असल्याची ग्वाही त्यांनी या पोस्टमधून दिली आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended