"सुरुवातीला अमिरने स्क्रिप्ट वाचण्यास देखील नकार दिला होता" ; अतुल कुलकर्णीने सांगितला लाल सिंग चढ्ढा सिनेमाचा 'तो' किस्सा

By  
on  

बॉलिवूड अभिनेता आमिर खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून आगामी लाल सिंह चड्ढा या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असून 'लाल सिंह चड्ढा’च्या माध्यमातून अभिनेता अतुल कुलकर्णी लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे. अतुल कुलकर्णीने या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. एका प्रसिद्ध वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अतुलने "आमिरने सुरुवातीला स्क्रिप्ट वाचण्यास देखील नकार दिला होता" असं म्हणत एक किस्सा सांगितला.

अतुल कुलकर्णीने सांगितले, "आमिर प्रॉडक्शनच्या ‘जाने तू या जाने ना’च्या प्रीमियरनंतर आम्ही आमिरच्या घरी गेलो होतो. रात्री जेवणानंतरच्या गप्पांमध्ये ‘फॉरेस्ट गंप’ सिनेमाचा उल्लेख आला. दुसऱ्या दिवशी मला १०-१५ दिवसांसाठी आऊटडोअर शूटसाठी जायचे होते, ते रद्द झाले. मोकळा वेळ असल्याने मी ‘फॉरेस्ट गंप’ पाहण्याचे ठरवले आणि ते पाहताना हीच घटना भारतात घडली तर काय होईल? असा प्रश्न मला पडला मग मी यावर नोट्स काढायला सुरुवात केली. त्यावेळी मी पटकथा लिहण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत चित्रपटाच्या कथेचा पहिला ड्राफ्ट आणि उर्वरित चार दिवसांत दुसरा ड्राफ्ट लिहून झाला. नंतर मग काही दिवसांतचं चित्रपटाची कथा देखील लिहून पूर्ण झाली."

त्यानंतर अतुलने ही कथा आमिर खानला पाठवल्यानंतर आमिरने २ वर्ष कथा वाचलीच नाही, शेवटी मग आमिरने अतुलला "तू लेखक नाहीस, पण तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला निराश केले नाही," असं सांगितले. यावर अतुलने आमिरला "तू कथा वाचुन फेकुन दिलीस तरी चालेल” असे म्हणत आमिरला ती कथा वाचण्यास भाग पाडले. पण त्यानंतर आमिरला ही कथा इतकी आवडली की त्याने केवळ अभिनयच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. असा किस्सा अतुलने शेयर केला.

Read More
Tags
Loading...

Recommended