....आणि कोल्हापुरात आकाश 'त्याला' भेटला!
अभिनेता आकाश ठोसरने अल्पावधीतच आपल्या चाहत्यांच्या मनात घर केले. त्याच्या 'परश्या' या भूमिकेची क्रेझ आजही इतक्या वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे. आकाशची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी तरुणींची आणि त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळते. आकाश त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे.
आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार परिषद आणि कॉलेज प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना त्याला एक वेगळा अनुभव आला. पत्रकार परिषद होईपर्यंत आकाशचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वाट बघत भर उन्हात थांबला होता. आकाश आपल्या चाहत्याला भर पत्रकार परिषदेच्या धावपळीतून वेळ काढून भेटला. त्याचबरोबर स्वतः नागराज मंजुळे देखील त्या चाहत्याच्या भेटीस जाऊन त्याच्याशी बोलले, त्याच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. आकाशचा तो चाहता दिव्यांग होता. यावरून आकाशचे आपल्या चाहत्यांवरचे प्रेम आणि चाहत्याचे आकाशबद्दलचे प्रेम दिसून येते.
आकाश ठोसरचा आगामी 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, सायली पाटील, दीप्ती देवी आहेत. आकाशने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली, तर 'परश्या' भूमिकेची चौकट मोडून, आगामी चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.