: शेवट कधीच सोपा नसतो.. 'तो' सीन आणि स्वप्नील
मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. टी.व्ही, सिनेमा , हिंदी मनोरंजनविश्व अशा सर्वच ठिकाणी स्वप्निलच्या अभिनयाची जादू चाहत्यांनी अनुभवली आहे. टेलिव्हिजनवर सध्या सुरु असलेल्या त्याच्या तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनात घर केलं. यात त्याची सौरभ पटवर्धन ही भूमिका सर्वांना खुप भावली. वयाची 40 उलटलेली सौरभ- अनामिकाची लव्हस्टोरी हिट ठरली. अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या सोबतची स्वप्निलची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. या मालिकेने या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला.
नुकताच मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्याच्याच चित्रीकरणाचा एक व्हिडिओ स्वप्नीलने शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की सगळेच कलाकार भावूक झालेले आहेत. तर आता स्वप्नीलने देखील आपल्या भावना पोस्ट शेयर करत व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये स्वप्नीलने लिहिलंय की, 'शेवट कधीच सोपा नसतो! आज रात्री T3 (तु तेव्हा तशी) संपत आहे. या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. ते तांत्रिकदृष्ट्या कठीण होते म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते.''
''इथे तयार झालेले बंध आणि हे आनंदाश्रू! आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं 'झी'चं कुटुंब. यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. आम्ही आमच्या कामाला घरचच कार्य समजतो! आणि आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता मालिका संपणार असल्याने आम्ही रोज भेटणार नसलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू!'' अशा भावना स्वप्नीलने व्यक्त केल्या आहेत.
स्वप्निल जोशीच्या या पोस्टवर चाहतेसुध्दा भावूक झाले.
स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर सोबतच सुहास जोशी, उज्ज्वला जोग, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. आता आजपासून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे